शिर्डी : मकर संक्रांति निमित्ताने शिर्डी साईबाबांना तामिळनाडू राज्यातील कोईंबतोर येथील एस. वाडीवेल या साईभक्ताने तब्बल 80 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी अर्पण केली. या साखळीची किंमत 5 लाख 73 हजार 430 रुपय असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. आज सायंकाळी साईबाबांच्या धुपाआराती आधी वाडीवेल साई भक्त परिवाराने साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. अतिशय सुंदर कारागिरी केलेली ही 80 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी वाडीवले परिवाराने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द केलीय. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने वाडीवेल या साई भक्त परिवाराचा शॉल साई मूर्ती देवुन सन्मान करण्यात आलाय. दरम्यान, आज मकरसंक्रांती असल्याने उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील अजय गुप्ता या साईभक्ताच्या देणगीतून साईबाबा मंदिरातील गाभारा व द्वारकामाई , गुरुस्थान मंदिरे तसेच साईबाबा समाधी मंदिराला बाहेरून विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.