मुंबई इंडियन्स तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंना देणार डच्चू, पाहा असं घडलं

2022-04-03 995

दुसऱ्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का बसला. या सामन्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सच्या संघात दोन मोठे बदल होणार आहेत. कारण आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये संधी मिळालेल्या दोन खेळाडूंना मुंबई इंडियन्सचा संघ डच्चू देऊ शकतो. पण या खेळाडूंकडून असं नेमकं घडलंय तरी काय, जाणून घ्या. 2 एप्रिलला झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची कामगिरी असफल ठरली. रोहित शर्माने यावेळी दुसऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला संघाबाहेर ठेवत अनमोलप्रीत सिंगला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय फसला. अनमोलप्रीतने पहिल्या सामन्यात ९ धावा केल्या होत्या आणि राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला पाच धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी अनमोलप्रीतला मुंबई इंडियन्सच्या संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी आता मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्सच्या संघात तिसऱ्या सामन्यासाठी जो खेळाडू दिसू शकणार नाही तो असेल वेगवान गोलंदाज बासिल थम्पी. कारण या सामन्यात थम्पीने फक्त एकच षटक टाकले. थम्पीच्या या एकाच षटकात राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरने तब्बल २६ धावांची लूट केली. जोसने या षटकात तीन षटकार आणि दोन चौकार लगावले, तर एक चेंडू निर्धाव गेला. एकाच षटकात २६ धावा दिल्यावर रोहित शर्माने थम्पीला पुन्हा गोलंदाजीसीठी संधी दिली नाही. त्यामुळे हे एक षटक मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वाईट ठरले. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात थम्पी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघात दिसेल, असे वाटत नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी अनमोलप्रीत आणि बासिल थम्पी यांना संघाबाहेर केले जाईल, असेच चित्र सध्या दिसत आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires