एसटीत असलेल्या दोन भावांचा आधीच मृत्यू; आता त्यांच्या मुलांचंही अपघाती निधन

2022-03-29 0

करोनानंतर ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून सप्टेंबर महिन्यात संगमनेर बसस्थानकात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू झालाय. नगर शहरातील पत्रकार चौकात एका ट्रकखाली दुचाकी चिरडून दोन युवक जागीच ठार झाले. त्यातील १९ वर्षीय उद्धव सुभाष तेलोरे हा त्या एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. तर त्याच्यासोबत प्रवास करणारा बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे याचाही मृत्यू झालाय. त्याच्या वडिलांचाही पूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. हे दोघेही पाथर्डी तालुक्यातील महाविद्यालयात शिकत होते.अपघातातील मृत युवकांबद्दल माहिती मिळाल्यावर प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय. हे दोघेही पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावचे आहेत. यातील उद्धव याचे वडील सुभाष शिवलिंग तेलोरे एसटी चालक होते. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी संगमनेर बसस्थानकात एसटी बसमध्येच गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. एसटीचा तुटपुंजा पगार, करोनानंतर ढासळलेली आर्थिक स्थिती याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. नगर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्याची ती पहिली आत्महत्या ठरली होती. त्यानंतर राज्यात आणखी काही ठिकाणी आत्महत्या झाल्या. पुढे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आणि अद्याप तो सुरूच आहे. याच तेलोरे यांचा मुलगा आज अपघातात ठार झाल्याने तलोरे कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्याच्यासोबत असलेल्या बाळकृष्ण याच्या वडिलांचेही पूर्वीच एका अपघातात निधन झाल्याचं बोललं जातं.

Free Traffic Exchange

Videos similaires