सध्या लग्नाचा सिझन मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे. अशात नवरदेव आणि नवरीचे वाहन सजवण्याकडे कुटुंबीयांचा महत्त्वपूर्ण कल असतो. परंतु धुळ्यातील शिंदखेडा येथील भारतीय सैन्यादलामध्ये कार्यरत असणाऱ्या हरपाल राजपूत या नवरदेव जवानाने नवरीला आणण्यासाठी सजवल्या जाणाऱ्या वाहनाच्या सजावटीतून देखील देशसेवा व देश प्रेमाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केलाय. नवरीला आणण्यासाठी सजवल्या जाणाऱ्या वाहनावर ह्या जवानाने युद्धात वापरल्या जाणाऱ्या रणगाडाची प्रतिकृती ठेवून भारतीय सैन्य दलाच्या सक्षमीकरणाचे दर्शन घडवले आहे. तर वाहनाच्या पुढील बाजूवर देखील रायफल धारी जवानांच्या प्रतिमा सजावट करून लावण्यात आल्यात. सजविलेल्या गाडीवर तिरंगी झेंडेही आकर्षक पद्धतीने लावले. भारतीय सैन्यालामध्ये कार्यरत असणाऱ्या या जवानाने आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवशी देखील देश सेवेचे दर्शन घडविण्याची संधी सोडली नाही. हरपाल राजपूत हे जम्मू काश्मीर येथील सीमाभागात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या वाहनाच्या सजावटीमधून दाखविलेल्या देश प्रेमाची व देशभक्तीची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.