तुटलेल्या बॅटने खेळणारा तिलक वर्मा नेमका आहे तरी कोण?

2022-03-28 70

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने ८१ धावांची दमदार खेळी साकारली असली तरी जोरदार चर्चा मात्र तिलक वर्माची सुरु होती. तिलकने या सामन्यात जवळपास दीडशेच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि आपल्यातील चमक पहिल्याच सामन्यात दाखवून दिली. पण हा तिलक वर्मा नेमका आहे तरी कोण हे या व्हिडिओतू जाणून घेऊया... तिलक हा मुळचा हैदराबादचा. त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्याच्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते की, त्याला ते क्रिकेटची तालीम देऊ शकतील. पण त्याच्यामधील गुणवत्ता प्रशिक्षकांनी ओळखली आणि कोणतेही पैसे न घेता त्याला क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली. तुटलेल्या बॅटने खेळणाऱ्या तिलकने क्रिकेटच्या ट्रेनिंगला सुरुवात केली. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तिलकची भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या संघात निवड झाली. भारताने हा विश्वचषक जिंकला आणि त्यामध्येही तिलकने महत्वाचं योगदान दिलं. या विश्वचषकात त्याने एकूण ८६ धावा केल्या, ज्यामध्ये ४६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. तिलकने दिल्लीविरुद्ध खेळताना १३९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. त्यामुळे आयपीएलच्या लिलावात तब्बल ९ पट जास्त किंमत मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी मोजल्याचं पाहायला मिळालं. अखेर मुंबई इंडियन्सच्या संघानं १.७० कोटी रुपये मोजत तिलकला आपल्या संघात दाखल केलं. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात तिलक फक्त १५ चेंडूंच खेळला. पण या १५ चेंडूंत तीन चौकारांसह त्याने २२ धावा केल्या. पण या १५ चेंडूंमध्ये तिलकमधील चमक ही चाहत्यांना चांगलीच भावली.

Videos similaires