आतापर्यंत आयकर विभागाच्या धाडी पडत असल्यामुळे चर्चेत असलेले शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याविषयी एक नवी घडामोड समोर आलीय. आयकर विभागाने जी छापेमारी केली होती, त्यात एक डायरीही हाती लागलीय आणि या डायरीत काही प्रमुख आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आहेत. यातली एक नोंद म्हणजे मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचं घड्याळ गिफ्ट दिल्याची नोंद आहे. मातोश्री म्हणजे आपल्या आईला हे दिल्याचं यशवंत जाधवांचं म्हणणं आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाचं नावही मातोश्रीच असल्यामुळे ट्वीस्ट निर्माण झालाय. या डायरीत नोंद नेमकी काय आहे, यशवंत जाधवांचा पाय एवढा खोलात का रोवला गेलाय आणि मातोश्रीमुळे कशी अडचण निर्माण झालीय सविस्तर या व्हिडीओत पाहू...
यशवंत जाधवांची आयकर विभागाकडून चौकशी केली जातेय आणि त्यांच्याच डायरीतील एका नोंदीमुळे ते पुरते अडकलेत का असा प्रश्न निर्माण होतोय. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दिलेल्या गिफ्टची नोंद या डायरीत आहे, ज्यानुसार मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचं घड्याळ गिफ्ट देण्यात आलं. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री असल्यामुळे ही नोंद पाहून सर्वांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. पण ही नोंद आपल्या आईला गिफ्ट दिल्याची असल्याचा दावा चौकशीत यशवंत जाधव यांनी केलाय. आयकर विभागही या दाव्यावर समाधानी नसल्याचं बोललं जातंय. यशवंत जाधवांच्या विविध नोंदी या अत्यंत महत्त्वाच्या डायरीत असल्याचं बोललं जातं. पण मातोश्रीच्या नावाने केलेल्या नोंदीमुळे यशवंत जाधवांची अडचण आणखी वाढू शकते. आता प्रश्न उरतो तो म्हणजे हे सगळं सुरू आहे, ते प्रकरण नेमकं काय आहे. खरं तर २५ फेब्रुवारीलाच आयकर विभागाने यशवंत जाधव आणि बीएमसीच्या काही ठेकेदारांवर छापेमारी सुरू केली होती. तिथूनच हे सगळं प्रकरण सुरू झालं. या नोंदींशिवाय आयकर विभाग न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेडसोबत झालेल्या वेगवेगळ्या व्यवहारांचीही चौकशी करत आहे आणि या कंपनीच्या मालकाचं नाव आहे बिमल अग्रवाल. यशवंत जाधव यांच्यावर ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची बाजू घेतल्याचा आरोप आहे. बिमल अग्रवाल आणि जाधव कुटुंबाचे व्यवहार सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत, ज्यात बिमल अग्रवाल यांना मुंबई महापालिकेची कंत्राटं मिळण्यासाठी झालेली मदत, मालमत्ता खरेदी या सगळ्याची चौकशी होतेय. या सगळ्यात सर्वात मोठी घडामोड आहे ती म्हणजे यशवंत जाधवांच्या डायरीतील संशयास्पद नोंदी. आधीच भाजप नेते सत्ताधारी शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक आहेत आणि त्यातच ही घडामोड समोर आलीय. यशवंत जाधवांनी ही नोंद आईसाठी असल्याचा दावा जरी केला असला तरी यानिमित्ताने भाजपला शिवसेनेला घेरण्याची आयती संधी मिळालीय. त्यामुळे एकीकडे जाधवांची चौकशी आणि दुसरीकडे राजकीय घडामोडी हे वाढणार हे निश्चित आहे.