एकाच महिलेवर दोघांचं प्रेम, प्रेयसीसोबत तो दिसताच याने काटा काढला

2022-03-26 53

राग आणि भावना एका क्षणात सगळं काही कसं उद्ध्वस्त करू शकते याची एक थरारक घटना समोर आलीय. एकाच महिलेवर दोघांचं प्रेम होतं. पण कालांतराने तिचा सहवास एकट्यालाच हवासा वाटू लागला आणि तीव्र द्वेषातून एकाने दुसऱ्याचा काटा काढला. आता ज्या महिलेमुळे हा वाद विकोपाला गेला तिलाही तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात ही घटना घडलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक असलेल्या नरेश सोनवणे याचं शिवाजीनगर परिसरातील पतीला सोडून विभक्त राहत असलेल्या महिलेवर प्रेम होतं. याच महिलेवर आरोपी आकाश सपकाळे याचंही प्रेम होतं. या प्रेमप्रकरणामुळे नरेश आणि आकाश या दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड राग होता. शनिवारी नरेश हा प्रेम असलेल्या महिलेसोबत शिवाजीनगर हुडको येथील घरकुल परिसरात असल्याची माहिती आकाशला समजली. आकाशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने अडीच वाजेच्या सुमारास घरकुल परिसर गाठला. आधीच एकमेकांविषयी राग आणि दोघे समोरासमोर आल्याने नरेश आणि आकाशमध्ये बाचाबाची झाली. यातूनच आकाशने नरेशला चाकूने भोसकलं. त्यानंतर आकाश आणि महिला घटनास्थळावरुन फरार झाले. काही जणांनी माहिती मिळाल्यावर घटनास्थळ गाठलं आणि नरेशला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. या प्रेम प्रकरणातून केलेल्या हत्येमुळे आता आरोपी आणि ज्या महिलेमुळे हे सगळं झालं तिलाही तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी असलेल्या नरेशला या घटनेत जीव गमवावा लागला.

Videos similaires