केंद्राशी राज्य सरकारने दोन हात करावे असं राज्यातल्या मंत्र्यांना तर वाटतंय, पण त्यासाठी पुढे यायचं कोणी हा खरा प्रश्न आहे. याबाबतचाच एक विषय सध्या चर्चेत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला जशास तसं उत्तर द्यायला पाहिजे, असा सूर बऱ्याच मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत लावला. बैठकीला सुरुवात झाली तेव्हा तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. काही वेळानंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर केंद्रीय यंत्रणांच्या जाचाबाबत चर्चेला सुरुवात झाली. तेव्हा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील बहुतांश ज्येष्ठ मंत्री विधिमंडळातील कामाचे निमित्त सांगत बैठकीतून काढता पाय घेताना दिसत होते. हा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून सुटला नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली. 'माझी सगळीकडे चौकस नजर असते. जशास तशी कारवाई व्हावी, पण ती दुसऱ्याकडून व्हावी, असंच सर्वांना वाटतं,' असं हसत म्हणत मुख्यमंत्र्यांनी मर्मावर बोट ठेवलं. केंद्राशी लढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त शिवसेनेला पुढे करत आहे का, उद्धव ठाकरेंनी नेमकी भूमिका काय मांडली आणि केंद्राशी दोन हात ठाकरे सरकार कसे करणार हे सविस्तर या व्हिडीओतून समजून घेऊ..