रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. अवघ्या कोकणात कळंबट येथील प्रसिध्द असलेल्या श्री धावजी देवाची पालखी भेटीला बाहेर पडली आहे. दूर ठिकाणी वास्तव्याला असलेल्या माहेरवाशिणी मूळ माहेर घरी येऊन ग्राम देवतेची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आजपासून गावागावांत पालखीची ग्राम-प्रदक्षिणा सनई, चौघडा व ढोल- ताशांचा आवाज घुमू लागला आहे. आपल्या घरी देव येणार म्हणून भक्तजन वाट पाहू लागले आहेत व ते देवाचे स्वागत करायला सज्ज झाले आहेत.