पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. यात प्रश्नपत्रिका बारावीच्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. या दुर्घटनेनंतर नाशिक-पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून वळवण्यात आली होती. पुणे बोर्डाला याची माहिती कळताच आली त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा केला. पेपरफुटी टाळण्यासाठी आणि गोपनीयता म्हणून प्रश्नपत्रिका छापाईचे काम महाराष्ट्राऐवजी बाहेरच्या राज्यात देण्यात आले होते. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन तसंच या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असे अनेक वाद सुरू आहेत. अशातच ही घटना घडल्याने बोर्डासमोर आव्हान निर्माण झालं आहे.