महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात मुंबईतील गोरेगाव परिसरात स्टेज कोळसल्याची घटना घडली. गोरेगावमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जो स्टेज बांधण्यात आला होता त्याची क्षमता कमी होती. मात्र, हाच स्टेज कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा सुरक्षित आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेजचा काही भाग कोसळला असल्याचं बोललं जात आहे. स्टेज कोसळल्याने एकच गोंधळ उडाला होता. मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन देखील केले आहे.