एसटी सेवेत अडथळे आणण्याचे प्रयत्न; जळगावात दोन बसेसवर दगडफेक

2022-01-22 56

जळगावात एकाच ठिकाणी दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. यात दोन्ही गाड्याचे नुकसान झाले असून यात एक चालक जखमी झाला आहे. अडीच महिन्यांनंतरही राज्यात एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. कामावर परतलेल्या मोजक्याच कामगारांच्या बळावर सेवा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नात अडथळे आणले जात आहेत. पारोळा ते मुकटी धुळे रस्त्यावर जळगाव आगाराच्या दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. जळगाव-धुळे मार्गावर विचखेडा या गावाजवळून एसटी बस जात असताना मोटरसायकल असलेल्या दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने बसवर दगड फेकून मारला. दुपारी पावणे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. बस चालकाने प्रसंगावधान बाळगल्याने मोठा अपघात टळला. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यामध्ये संशयित दुचाकीस्वारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.