महाराष्ट्र वीरांची भूमी म्हणून का ओळखली जाते याचा प्रत्यय आजची पिढीही वारंवार आपल्या कृतींमधून दाखवून देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत. सोलापूरच्या श्रुती गांधीने आपल्या १८ महिन्यांच्या लेकीसोबत राज्यातील सर्वोच्च 'कळसूबाई शिखर' सर करत हे दाखवून दिलं आहे. फक्त १८ महिन्याच्या उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आपल्या आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केलं आहे. सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवार श्रद्धा ठेऊन गडकिल्यांच्या भ्रमंतीची मोहीम मागच्या वर्षभरापासून राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ९ जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या औचित्यावर पहाटे चार वाजता कळसूबाई शिखरावर चढाई करत तिरंगा फडकवला. ८ वाजण्याच्या सुमारास या मायलेकींनी शिखर सर केला होता. श्रुती गांधी यांना उर्वीचा पहिला वाढदिवस कळसुबाई शिखरावर साजरा करण्याची इच्छा होती. पण करोनामुळे त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण यावेळी मात्र त्यांनी निर्धार केला आणि तो पूर्णही केली. उर्वी आणि तिच्या आईच्या कामगिरीने अनेकांना हिरकणीची आठवण करून दिली आहे. तसंच आपला इतिहास आणि शिवरायांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेशही आपल्या कृतीतून दिला आहे. माय लेकींनी भगवा आणि तिरंगा घेऊन नभाला नमस्कार केल्याने सगळीकडेच त्यांच कौतुक होतयं.