गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणं हे नियमितपणे चालू असते. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याला कारणही तसंच आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे . पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याच निमित्ताने पुणे शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष आणि नगरसेवक शंकर केमसे यांनी रक्तदान शिबीर घेतले. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला हे लक्षात घेत त्यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास दोन किलो चिकन तर अर्धा किलो पनीर देण्यात आलं.
अधिकाधिक संख्येनं नागरिकांनी रक्तदान करावं, एवढाच यामागचं उद्देश असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.