भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे आज ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. तामिळनाडू येथील कुन्नुर भागात हा अपघात झाला. या अपघातात रावत यांच्यासह आणखी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ते देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख होते. तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी जनरल बिपिन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली होती. याआधी ते देशाचे लष्करप्रमुख होते. जनरल रावत यांनी देशाचे २६ वे लष्करप्रमुख म्हणून निवृत्ती स्वीकारल्याच्या दिवशीच संरक्षणप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. जनरल बिपिन रावत यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.