पुणे : भगवान नारायण लक्ष्मीला सोडून सकाळी एकटेच प्रदक्षिणेसाठी गेल्यामुळे चिडलेल्या लक्ष्मीदेवीचा राग अनावर झाला आणि त्या रागाचा सामना भगवान नारायण यांना करावा लागला. लक्ष्मीदेवीने त्यांना घरातच घेतले नाही. सात वेळा दरवाजा बंद केला. परंतु, भगवान नारायण शेवटी लक्ष्मीदेवींना प्रसन्न करतात आणि मग ब्रम्होत्सव साजरा केला जातो. हा ब्रम्होत्सवाचा सोहळा आज (दि. ६) पुण्यातील कापडगंज येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात उत्साहात पार पडला. गेल्या ९० वर्षांपासून ही परंपरा या मंदिरामध्ये सुरू आहे. मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त हा सोहळा साजरा केला जातो. त्याबाबत लक्ष्मी-नारायण यांच्या प्रेमाची अख्यायिकाही सांगितली जाते.