सातारा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे राज्याचा कारभार उत्तमप्रकारे सांभाळला. या कार्यकुशल नेतृत्वाचा काहींना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच एकनाथ खडसेंचा गेम करून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. श्री. दरेकर आज (गुरुवार) सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या दौ-यावर आले आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांची छबी बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे यांचा वापर केलेला आहे, असे ते म्हणाले.