पुणे - वारकरी सांप्रदायाच्या सहवासात आला की कुणीही भक्तीमय होऊन जातो. त्या व्यासपीठावर जात, धर्म, पक्ष, पंथ असे काहीच उरत नाही. टाळ मृदंगाचा ठेका कानावर आला की मग पावलं आपोआप नाचू लागतात. हा प्रत्यय आजही आला. एरव्ही दोन भिन्न राजकीय पक्षांमध्ये राहणारे नेते एका व्यासपीठावर वारकऱ्यांमध्ये रमले.
निमित्त होते ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या एकसष्टीनिमित्त करण्यात आलेल्या सत्काराचे. विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे एकसष्टी गौरव समितीतर्फे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प किसनमहाराज साखरे यांच्या हस्ते डाॅ. देखणे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसोबत पालकमंत्री गिरीष बापट आणि माजी मंत्री व काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.