swineflu-beed

2021-04-28 3,598

स्वाइन फ्लूच्या भीतीचे दुकडेगावावर सावट
वडवणी - स्वाइन फ्लूमुळे वीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने दुकडेगाव (ता. वडवणी) येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य पथकाने गावात तपासणी करून संशयितांचे रक्त नमुने घेतले. दरम्यान, विनीता बडेवर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुकडेगाव येथील विनीता सत्यप्रेम बडे (वय २०) या गर्भवती महिलेचा शनिवारी (ता. १७) रात्री स्वाइन फ्लूने बीड येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. शनिवारी रात्री तिचा मृतदेह दुकडेगाव येथे आणण्यात आला. रविवारी (ता. १८) सकाळी ही बातमी समजल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. केवळ सर्दी, पडसे, खोकला ही लक्षणे असलेले ग्रामस्थ आपल्याला स्वाइन फ्लूची लागण तर झालेली नाही ना? याची चर्चा करू लागले. काहींनी खासगी दवाखाने गाठले.