पुणे - एक, दोन, पाच, दहा, पंचवीस, पन्नास करता करता, पुणे आणि मुंबईतील प्रवाशांशी जिव्हाळ्याचं नातं जोडणाऱ्या दख्खनच्या राणीचा अर्थात डेक्कन क्वीनचा 'सहस्रचंद्रदर्शन सोहळा' आज (मंगळवार) या गाडीवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रवाशांच्या उपस्थितीत साजरा झाला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर मोहनसिंग राजपाल, पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष कनुभाई त्रिवेदी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा, पुणे-मुंबई प्रवासी संघाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत टपाले यांच्यासह अनेक मान्यवर गाडीच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थित होते.