गीतकार : ग. दि. माडगुळकर, गायक : सुधीर फडके, संगीतकार : सुधीर फडके, चित्रपट : प्रपंच - 1961
विठ्ठला, तू वेडा कुंभार
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार
माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार
घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार
तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार